logo

प्रेरणास्थान

QR Code
गावमयन सत्र सोमयाजी दीक्षित रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज

यज्ञनारायण भगवान की जय 🙏🏻
एक व्यक्ती! एक नाव! श्रद्धावान परितत्त्वासाठी प्रातःस्मरणीय संत विभूती ! यज्ञ संस्थेच्या संशोधक आणि अभ्यासकांसाठी अत्यंत दुर्मिळ अशी सुवर्णसंधी! दानशूर भाविकांसाठी मनाला असीम समाधान देणारे दान क्षेत्र! धर्मांतील अंधश्रद्धा, निरुपयोगी परंपरा, व्यर्थ दंभाचार, आदींच्या विरोधात रणझुंझार सेनापती! दुःखितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करणारा आधुनिक दधिची ऋषि! ज्याचं संपूर्ण जीवनच एक महायज्ञ आहे आणि ज्याचं प्रत्येक कर्म पवित्र आहुति, असे प्रखर कर्मयोगी, ज्ञान योगी!भक्ती योगी! औसा तालुक्यातील 'सेलु' या गावी वेदविद्या पारंगत, सुसंस्कृत, सधन घराण्यात त्यांचा जन्म झाला. वडीलांची आजन्म श्रौत दीक्षा घेवून त्यांचा खडतर प्रवास सुरु झाला. एकीकडे संसाराची धुरा खांद्यावर होतीच परंतु वडिलांचे विहित कार्य पुढे नेण्याची जबाबदारी पण होतीच आणि ते परम कर्तव्यसुद्धा होते. वाट अवघड होती. श्री.रंगनाथ महाराज कणखर, बाणेदार, ध्येयवेडे व पोलादी पुरूष होते. आपल्या प्राचीन वेदांची जपणूक करण्यासाठी व महाराष्ट्रात आपले विद्यार्थी तयार व्हावे म्हणून १९९५ मध्ये गंगाखेड, जि. परभणी येथे संस्कृत वेद विद्यालय स्थापन केले.

संपूर्ण देशभर प्रवास करून महाराजांनी खूप माणसे जोडली. अविरत कष्ट आणि अखंड प्रवासामुळे विश्रांती कधी घेतलीच नाही. ते स्वभावाने अत्यंत कोमल, कुटूंबवत्सल, विनोदी कवी व लेखक, प्रभावी वक्ते सुद्धा होते. प्रपंच्यातील कर्तव्याकडे कधी पाठ फिरवली नाही, सगळे नाते आपलेपणाने जपले. पूर्वायुष्यात सेलुला असताना दादांनी शेती व्यवसाय पाहीला. गावचे सरपंच झाले, स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून देवून काम केले पण त्याचे कसलेही मानधन त्यांनी कुटूंबासाठी घेतले नाही. बसवकल्याणच्या दत्तसांप्रदायाची गुरूपरंपरा व कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेवर दादांची अत्यंत श्रध्दा होती. ते अंधश्रध्दाळू व फक्त कर्मकांड जपणारे नव्हते. समाज मन जपून, प्रवाहाबरोबर चायलायचे पण त्यांना भान होते. सगळीकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती.

समुद्र लहरी जशा समुद्राच्या मूळ गाभ्यातून निघून वर उचंबळत येतात व शेवटी किनाऱ्याकडे पोहचून त्या संपतात, त्याच प्रमाणे दादांचे कार्य हे मुळ गाभ्यातुन म्हणजे त्यांच्या गुरुच्या प्रेरणेतून निघून ते पूर्णत्वाकडे जाऊनच संपते. ह्या लहरी निष्ठेच्या, ह्या लहरी कार्याच्या, ह्या लहरी धर्म, कर्म आणि गुरु निष्ठेच्या आहेत. ह्या लहरी आनंद सांप्रदायांच्या सागरातून उत्पन्न झालेल्या आहेत.

अग्निहोत्र दीक्षा घेण्या पूर्वी परमपूज्य रंगनाथ महाराजांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला असला तरीही, महाराष्ट्रातील मराठवाडा भाग अजूनही निजामाच्या जोखडाखाली होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला. परमपूज्य रंगनाथ महाराज या लढ्यात संपूर्ण सामर्थ्य निशी उतरले. त्यासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सेलूतुन परागंदा व्हावे लागले. जवळपास दोन ते तीन वर्ष सर्व कुटुंबाला नाझरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी राहावे लागले. यावेळी परमपूज्य रंगनाथ महाराज हे भूमिगत राहून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे काम करीत होते.ते कधीही निजाम पोलिसांच्या हाती लागले नाहीत.लढा संपला आणि मराठवाडा महाराष्ट्र सामील झाला. पुढे काही वर्ष महाराजांनी राजकारण केले. सेलूचे सरपंच म्हणून काम पाहिले. सेलू मध्ये शाळा, शेतकरी सहकारी सोसायटी, पोस्ट वगैरे सुविधा गावात आणल्या. मात्र पुढे त्यांचेही मन हळूहळू विरक्तीकडे झुकू लागले. वडिलांच्या देहावसानानंतर सन १९६६ मध्ये त्यांनी प्रथम स्मार्ताधान व नंतर सन १९७२ मध्ये श्रौताधान दीक्षा घेऊन आपले जीवित कार्य निश्चित केले. पुढे अनेक स्मार्त यज्ञ केले आणि सन १९८० मध्ये पहिला सोमयाग नांदेड येथे केला. एकूण 14 निरनिराळ्या प्रकारचे सोमयाग व शेवटी वर्षभर चालणारा गवामयन सत्र सोमयाग गंगाखेड (सन १९९९-२०००) येथे करून सोमयागाची मालिका पूर्ण केली.

सहज बोलणे हाची उपदेश । करूनि सायास शिकविती ।।

ह्याचप्रमाणे महाराजांनीही आपल्या कष्टमय, संघर्षमय व क्रांतीकारी जीवनातून संपूर्ण जगाला पुन्हा एकदा यूगपूरूषाची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे पूज्य आद्य शंकराचार्य, राजा शालिवाहन किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्या सर्वांना त्यांनी केलेल्या त्या त्या काळातील उलट्या प्रवाहातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 'यूगपुरुष' म्हटलं जात. त्याचप्रमाणे परम पूज्य रंगनाथ महाराजांनी त्या काळात चालत असणारे सपशूयाग ही अघोरी, असूरी परंपरा, ज्यामूळे यज्ञाकडे घृणत्वाच्या भावनेने लोकं बघत होती. ती असूरी परंपरा मोडून काढून एक 'यूगपुरूषाचं' कार्य त्यांनी केलं. काही विद्वान पंडितांचा विरोध झुगारून "अपशुयाग" प्रारंभ केले.यज्ञसंस्थेला आलेली ग्लानी, मरगळ दूर केली आणि यज्ञसंस्था पुन्हा प्रस्थापित केली.
आणि आजच्या घडीला त्यांच्या कार्याची धुरा अगदी आसमानी पोहोचलेली आहे!
महाराजांनी आपल्या कष्टमय, संघर्षमय व क्रांतीकारी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केलेले आपले कार्य हे संपूर्ण विश्वासमोर आदर्शवत आहे !